रघुवीर मुळगावकर Raghuvir Mulgaonkar

 This is compilation of the paintings by Shri Raghuvir Mulgaonkar. I will keep adding more as I go through the collection of his works

I will also collect more information on the artist and will publish the same here for the readers.




Product Packaging for Jai kajal, 1956

Most famous campaign of Raghuvir Mulgaonkar




Movie Advertisement, Bala Jo Jo Re, 1951




Vangmay Shobha Diwali Ank 1951, Cover




Vangmay Shobha August 1951, Cover




Vangmay Shobha April 1951, Cover





Vangmay Shobha October 1950, Cover



Vasant, October, 1952






Maharashtra, February, 1954





Maharashtra, October, 1954






Information Courtesy : https://www.indiaart.com/
Mulgaonkar specialised in anatomical study and all his paintings reflect the realistic forms. In a span of 30 odd years, Mulgaonkar painted around 7000 paintings on various subjects like mythology, social issues, and even some advertisements. His famous campaign is jai kajal. He was renowned as the man who gave a face to gods. Mulgaonkar was a born artist though he came from a family of artists, his father never encouraged him in this field. He learnt painting from trindath and spray work from famous artist S. M. Pandit. mulgaonkar painted about 3 - 4 pictures a day and he gained the label - 'the artist whose brush never dried'. In all his paintings mulgaonkar used his imagination to depict a scene and never used models or photographs unless the client specified. He died in 1976.


संदर्भ - 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर मं. गो. राजाध्‍यक्ष लिखित लेख
रघुवीर मुळगावकरांचा जन्म झाला गोव्यातील अस्नोडा येथे, 14 नोव्हेंबर 1918 रोजी (कार्तिक शुध्द चतुदर्शी शके 1840) रात्री 8.15 वाजता. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हेही चित्रकार होते. त्यांचे मूळ नाव राजाध्यक्ष. त्यांनी ते गावाच्या नावावरून मुळगावकर केले. शंकररावांनी गोव्यात चित्रकलेचा एक क्लास चालवला होता. त्यांचा मोठा मुलगा देखील चित्रकलेत पारंगत होता. पण दुर्दैवाने, तो अल्पायुषी ठरला. पुढे रघुवीरने वडिलांचा केवळ वारसा चालवला नाही तर मुळगावकर हे नाव उत्कर्षावर नेऊन ठेवले!
प्रसिध्द चित्रकार त्रिंदाद हे मुळगावकरांच्या शेजारी राहत. छोटा रघुवीर त्यांची चित्रे न्याहाळत बसत असे. त्रिदांदांनीही या मुलातील कलागुण हेरले होते. त्यांनी शंकररावांना सांगितले, की ''हा मुलगा पुढे चित्रकलेतच नाव कमावणार आहे. त्याचे भविष्य त्यातच आहे. त्याला मुंबईला पाठवा. त्याच्या क्षेत्राला वाव देणारे ते एकच ठिकाण आहे.''
रघुवीर मुळगावकर मुंबईला आले. त्या काळात चित्रमहर्षी एस.एम. पंडित यांचे नाव सर्वत्र गाजत होते. चित्रपट, पोस्टर्स, कॅलेंडर्स ही माध्यमे प्रकर्षाने लोकांसमोर होती. त्यांचे मोठया प्रमाणातील काम पंडितांकडे चालत असे. मुळगावकरांनी मुंबईला आल्यानंतर काही काळ एस.एम. पंडितांकडे काढला. मुळगावकरांनी एकलव्याप्रमाणे पंडितांचे काम न्याहाळत त्यांची शैली जवळून अनुभवली.
नंतर मुळगावकर गिरगावात स्थायिक झाले. तेथे कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, ग.पां. परचुरे, रायकर यांच्या प्रकाशनांच्या पुस्तकांच्या वेष्टनांची कामे मिळू लागली. तो काळ मराठी साहित्यातला सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पुस्तके, मासिके याचसोबत कॅलेंडर्सही मोठया प्रमाणात प्रकाशित होत असत. उत्पादन कोणतेही असो, त्यावर देवदेवतांची चित्रे असलेली कॅलेंडर्स छापली जात असत. आणि ही सर्वच मुळगावकरांच्या कुंचल्याने नटू लागली. प्रत्येक देवाची ओळख मुळगावकरांच्या चित्राने होऊ लागली. मुळगावकरांनीच देवांना चेहरे दिले. पूर्वी राजा रविवर्माने देवदेवतांची चित्रे काढून ती घरोघरी पोचवली होती. तेच काम मुळगावकरांनी एवढया मोठया प्रमाणावर केले, की त्यांच्या चित्रांमुळे ते प्रत्येक मराठी कुटुंबाचा हिस्सा बनले. प्रत्येक माणसाने आपल्या मनात जपलेल्या दैवताला मुळगावकरांनी मूर्त स्वरूप दिले. असा कोणताही देव किंवा त्याचा अवतार नसेल की जो मुळगावकरांच्या कुंचल्याने साकार झाला नाही. श्रीराम-सीता, यशोदा-कृष्ण, विष्णू-लक्ष्मी, सरस्वती, गणेश, शंकर-पार्वती अशा अनेक देवतांना त्यांनी साकारले. कृष्ण रूप तर त्यांनी अगदी बालपणापासून ते कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगण्यापर्यंत विविधतेने रेखाटले आहे.

आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांची पुस्तके मुळगावकरांच्या कुंचल्याने सजवली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक मासिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली आहेत. मुळगावकरांनी एकटया 'दीपलक्ष्मी' मासिकासाठी 1958 ते 1976 पर्यंत एकूण अठरा वर्षे मुखपृष्ठे बनवली आहेत. 'दीपलक्ष्मी'चे ग.का. रायकर व 'शब्दरंजन'चे (आता 'कालनिर्णय'चे) जयंत साळगावकर हे मुळगावकरांचे जिवलग स्नेही.

मुळगावकरांनी देवदेवतांप्रमाणे काही व्यक्तिरेखाही अमर केल्या. बाबुराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारूहास आदी गुप्तहेर मुळगावकरांनी साकारले होते. दरमहा सहा कथा प्रसिध्द होणाऱ्या या मालिकांना मुळगावकरांनी अशा रीतीने सादर केले, की धनंजय वगैरे पात्रे काल्पनिक असूनही वाचकांना ती खरीखुरी वाटत!

मुळगावकरांनी कथाचित्रेही अमाप काढली. विशेषत: त्यांची कृष्णधवल रंगातील कथाचित्रे, मग ती हाफटोनमधील वॉश ड्राईंग असोत, वा सरळ रेषांमध्ये काढलेली लाईन ड्राईंग असोत, ती अतिशय सुंदररीत्या काढलेली असत. चित्रांच्या चेहऱ्यांतील गोडवा हा मुळगावकरांनीच रेखाटावा. तसेच, काळया रंगाचा वापर हा जसा मुळगावकरांनी केला तसा अन्य कोणालाही तो जमलेला नाही. या कृष्णधवल रंगांमध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक चित्रमालिका त्यांनी प्रसिध्द केल्या. त्यामध्ये गणेश पुराण, रामायण, महाराष्ट्रातील संत आदी मालिका प्रसिध्द आहेत. विशेषत:, गणेशाची वयोमानानुसार विविध रूपे त्यांनी विशेष अभ्यास करून रेखाटली होती.

मुळगावकरांच्या चित्रांमध्ये सौंदर्य हे खचखचून भरलेले असे. चित्रातील केवळ मूळ व्यक्तिरेखेपुरते ते महत्त्व ठेवत नसून त्याच्या सभोवतालची पार्श्वभूमीही विषयानुसार ते रंगवत असत. मग ती देवादिकांची चित्रे असल्यास त्यांच्या कुंचल्याला मर्यादाच पडत नसे. स्वर्गलोकातील स्वप्ननगरीचे दर्शन ते मोठया कौशल्याने करत असत. फुलाफळांनी लगडलेल्या वृक्षवल्ली, खळाळते झरे, आनंदाने बागडणारे पशुपक्षी, त्यांतील धूसर, स्वप्नवत वातावरण हे ते खास असे मुळगावकरी रंगसंगतीने मोठया कुशलतेने रंगवत.

त्यांना रंगसम्राट मानले गेले. ही पदवी त्यांना देण्यात आली ती त्यांच्या रंगांवर असलेल्या असामान्य प्रभुत्वामुळे! आपल्या दैवी कुंचल्यातून ते विविध रंगांची मुक्त अशी उधळण करत असत, की पाहणाऱ्याच्या नजरेचे पारणे फिटावे. मात्र ती करत असताना त्यांतील समतोल किंचितही ढळला जात नसे. उलट, एकाच रंगाच्या अनेक छटा ते ज्या पध्दतीने दर्शवत, ते कौशल्य पाहून मन थक्क होते.

स्त्रीसौंदर्य रेखाटावे ते केवळ मुळगावकरांनी! लोभस, गोड चेहऱ्याच्या स्त्रिया, त्यांच्या चेहऱ्यावरील लाडिक भाव, आरक्त गाल, डोळयांतील बोलकेपणा, केशसंभार, अंगावरील आभूषणे अन् त्यांचे पोषाख हे सर्व पाहणाऱ्याला मुग्ध करून सोडत असे. मात्र त्यांनी आपल्या चित्रामध्ये अश्लीलता व बीभत्सता यांना बिलकुल थारा दिला नाही. त्यांची चित्रे शालीनता अन् सोज्वळता यांचा सुंदर मिलाफ असलेली असत. त्याचप्रमाणे लहान बालकांचे रेखाटनही त्यांच्याकडून सुरेख व्हायचे.

त्या काळात म्हटले जायचे की कोणताही पुरुष आपणास पत्नी कशी हवी, तर 'मुळगावकरांच्या चित्रातील स्त्रीप्रमाणे' असे सांगे व कोणतीही स्त्री आपणास होणारे बाळ हे 'मुळगावकरांच्या चित्रातील बालकाप्रमाणेच सुंदर व गुटगुटीत हवे' असे प्रतिपादन करे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या चित्रांतील दागिने व पोषाखांच्या फॅशनच्या नकलाही स्त्रिया करत असत.

मुळगावकरांनी चित्रकलेचे शास्त्रशुध्द असे शिक्षण घेतले नव्हते. यामुळे त्यांचा ऍनाटॉमीचा अभ्यास झाला नव्हता व त्याची त्यांना खंतही होती. अशा वेळी जर का कोणी त्यांची तुलना त्यांचे समकालीन दीनानाथ दलाल यांच्याशी केली तर ते पटकन म्हणत, ''तो केतकरांकडे शिकला अन् मी परमेश्वराकडे शिकलो आहे!''

सुमारे पाच हजारांवर चित्रसंपदा निर्माण करणाऱ्या मुळगावकरांची 'स्प्रे' या माध्यमावर जबरदस्त पकड होती. त्यांनी या माध्यमाचा वापर मोठया कुशलतेने केला. त्यांच्या कामाचा झपाटादेखील मोठा होता. त्यांच्या कुंचल्यावरील रंग कधीच सुकत नसे. त्यांच्या इतकी विपुल चित्रसंपदा करणारा अन्य चित्रकार झाला नाही.

त्यांची भावजय व प्रसिध्द गायिका नलिनी मुळगावकर यांनी संपादित केलेल्या 'रत्नदीप' दिवाळी अंकामध्ये त्यांनी कथाचित्रे व चित्रमालिका चितारणे सुरू केले. पुढे त्यांनी स्वत:चा 'रत्नप्रभा' हा अंक सुरू केला. या वार्षिकामध्येही त्यांनी आपल्या खास चित्रांचा खजिना वाचकांना दरवर्षी दिला. 'रत्नप्रभा'ने आणला वाङ्मयीन दर्जाही उत्कृष्ट राखला होता. अंक वाचून झाल्यावर त्यातील चित्रे सोडवून त्यांचा संग्रह करण्याकडे वाचकांचा कल असे. आजही काही कुटुंबांनी ही चित्रे सांभाळून ठेवलेली आढळतात.

मुळगावकर हे मितभाषी होते. ते कमी बोलत. त्यांचे हसणेही ओठात दाबून केलेले असे. उंच, गौरवर्णाचे, सडपातळ बांध्याचे मुळगावकर आपल्या पोषाखाच्या बाबतीत एकदम लक्ष ठेवून असत. डोक्यावरील दाट कुरळे केस चोपूनचापून बसवलेले असत. स्वच्छ तलम धोतर, वर सोन्याची बटने लावलेला रेशमी शर्ट, त्याला बाहेरून लावायच्या कॉलरवर डबल ब्रेस्टचा कोट, पायात चकचकीत वाहणा, डोळयांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा असा त्यांचा पेहराव असे. स्वत:च्या आयुष्याला त्यांनी शिस्त लावून घेतली होती. चित्र काढताना ते कोणालाही जवळ यायला वा चित्र पाहायला देत नसत. ज्याच्यासाठी चित्र असे ते नीटनेटके बांधून ठेवलेले असे. त्याने ते बाहेर गेल्यानंतरच उघडून पाहावे. सत्यनारायणाच्या पुजेला जाताना न्यायचा नारळदेखील ते पॉलिश पेपर मारून, गुळगुळीत करून नेत असत. त्यावर सुरेखशी रेखीव अशी शेंडी असे. ही सर्व वैशिष्टये मुळगावकरांच्या नीटनेटक्या अन् शिस्तबध्द व्यक्तिमत्वाची प्रतीके होती. त्यांच्या चित्रांवरील त्यांची इंग्रजीमधील सहीदेखील छापील वाटावी अशा पध्दतीची असे. हजारो चित्रे जरी पाहिली तरी या सहीमध्ये थोडादेखील बदल जाणवणारा नव्हता.

आपण काढलेले चित्र चांगले छापले जावे याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे कित्येक प्रकाशकांना, त्यांची चांगला प्रिंटर निवडण्याची ऐपत नसल्यास, त्यांनी स्वत: चित्रे छापून दिली आहेत. कित्येक मराठी मासिकांना त्यांनी विनामूल्य चित्रे दिली आहेत. मुळगावकरांकडे पाहिले की स्वर्गातून अवतरलेला एखादा यक्षकिन्नर अथवा रंगभूमीवर एण्ट्री घेतलेल्या एखाद्या नायकाप्रमाणे ते भासत. आपल्या लांबसडक बोटांमध्ये त्यांनी ब्रश पकडला की जणू चित्रसंपदा निर्माण करण्यासाठी विधात्याने त्यांना घडवल्याची जाण होई. मात्र एवढया प्रमाणात काम करणारे मुळगावकर संध्याकाळ झाली, की स्टुडिओ बंद करून आपल्या कुटुंबीयांत रंगत. ग्रामोफोनवर लता-रफी यांची गाणी ऐकत. अभिजात कलावंत असलेला हा महामानव कलासक्त जीवन जगला.

'रंगसम्राट' या पदवीबरोबरच मुळगावकरांना 'चित्रसार्वभौम' ही पदवीही मिळाली होती आणि ती शंकराचार्यांनी दिली होती. सार्वभौम म्हणजे सर्व भूमीवरील एमकेव असा चित्रकार. रंगांच्या मैफलीत बेभानपणे रंगलेल्या या कलावंताला अचानक कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले. त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचार चालले होते. त्याचेही परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवत होते. त्यामुळे ते कोणाला भेटत नसत वा कोणी भेटायला आलेला त्यांना आवडत नसे. आणि 30 मार्च 1976 रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी, वयाच्या केवळ अठ्ठावन्नाव्या वर्षी मुळगावकर नावाचे युग अस्त पावले!

Comments

Popular posts from this blog

Indian Postage Stamps in Devanagari - Compilation

Some interesting Soap Advertisements from the past